खुशखबर ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ‘या’ योजनेत महत्त्वाचे बदल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा पातळीवरली स्वाधार योजना आता तालुकास्तरावर राबवली जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून दिलासा मिळाला आहे. पूर्वीची पाच किलोमीटरची मर्यादा आता 10 किलोमीटर करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

काय आहे योजना
दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयाची संख्या आणि याठिकाणी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरु करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.

काय आहेत योजनेच्या अटी
स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी, 12 वी, पदवी व पदवीका परीक्षेमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रीकत्तोर शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी विद्यार्थ्याच्या खात्यावर 43 ते 60 हजार रुपये क्षेत्रानुसार रक्कम देण्यात येते.

या ठिकाणी करू शकतात अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in व https://sjsa.maharashtra.gov.in याबरोबर https://www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादीसह तो विद्यार्थ्याने जातीचे प्रमाणपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या मेलवर पाठवाव लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा मेल आयडी आहे. याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तालुकास्तरावर विद्यार्थ्यांना लाभ
शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या 11 वी आणि त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महापालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार शहरापासून पाच किमी हद्दीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या, ही मर्यादा आता 10 किमी व तालुकास्तरावर वाढविण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like