खुशखबर…..राज्यात मान्सून उद्यापासून बरसणार, मुंबईत ‘हाय-अलर्ट’

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून , तर राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मान्सून उद्यापासूनच येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत 6 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा ‘स्कायमेट वेदर’ या संस्थेने दिला असून, 26 जुलै 2005 पेक्षा जास्त भयानक परिस्थिती उद्भवू शकते, असेही म्हटले आहे.

नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) मंगळवारी कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडू, रायलसीमा व आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, पश्‍चिम मध्य बंगालचा उपसागर व्यापला. दरम्यान, मान्सून आज (बुधवार) गोव्यात एंट्री करणार असून, उद्या (गुरुवार) तळ कोकणात तो डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दि. 7 ते 12 जूनदरम्यान कोकण किनारपट्टी, मुंबई येथे वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवसात मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण निर्माण होत असून, संपूर्ण कर्नाटक, संपूर्ण गोवा, तळ कोकणाचा काही भाग, आंध्र प्रदेश व तेलंगणाचा उर्वरित भाग येथे तो पोहोचेल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. राज्यात उष्णतेच्या झळा कमी झाल्या आहेत.

मुंबईत ‘हाय अलर्ट !

26 जुलै 2005 हा दिवस कोणताही मुंबईकर विसरू शकणार नाही. त्या दिवशी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीने देशाच्या आर्थिक राजधानीत जलप्रलयासारखी स्थिती निर्माण झाली होती. एकाच दिवसात तब्बल 900 मि.मी. पाऊस पडला होता. तितकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पाऊस येत्या आठवड्यात मुंबईत पडू शकतो, असा इशारा ‘स्कायमेट’चे मुख्य कार्यकारी जतिनसिंग यांनी एक ट्विट करून दिला आहे. मुंबईत 8 जूनपासून पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांनी सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.