चित्रपट रसिकांसाठी खुशखबर ! 1 फेबु्रवारीपासून सिनेमागृहे ‘हाऊसफुल्ल’, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून SOP जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देशभरातील सर्व चित्रपटगृहे मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत चित्रपटगृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह, सिनेमा हॉल सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र, माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीत केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देण्यात आली. परंतु, आता 1 फेब्रुवारी 2021 पासून म्हणजेच उद्यापासून 100 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरु करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात एसओपी जाहीर केली असून 100 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांच्या आत आणि कॉमन एरियामध्ये प्रेक्षकांना सहा फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि प्रेक्षक बाहेर पडणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझर असणे बंधनकारक आहे. याशिवाय चित्रपटगृहांमध्ये थुंकण्यास बंदी असेल. चित्रपटगृहामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

1 फेब्रुवारीपासून देशातील सर्व चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेसह सुरु होणार आहेत. याशिवाय पार्किंग लॉट आणि चित्रपटगृहांच्या जवळपास गर्दी नियंत्रित करण्यास सांगण्यात आले आहे. पार्किंमध्ये देखील सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे लागणार आहे. लिफ्टमध्ये जास्त प्रेक्षकांना प्रवेश देण्यास टाळावे, असे सरकारने सांगितले आहे. इंटरवलच्यावेळी कॉमन एरिया, लॉबी, शौचालयांमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता चित्रपटगृहांनी घेयची आहे. इंटरवलमध्ये प्रेक्षकांना जागेवरून न उठण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. शिवाय इंटरवलचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.