खुशखबर ! मुंबई-गोवा अंतर केवळ 5 तासांत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किमी लांबीचा एक्सप्रेस वे तयार केला जात आहे. त्यामुळे हा प्रवास काही तासांमध्येच पूर्ण करता येणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा एक्सप्रेस-वे योजनेची घोषणा शनिवारी करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अप्पर हाऊस येथे मोठी घोषणा केली. लवकरच मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या 4 ते 5 तासांत पूर्ण करता येणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या (500 किमी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे) पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना आखण्यात येणार आहे. सध्या या प्रवासाला 11 ते 13 तासांचा वेळ लागतो.

यासंदर्भात एमएसआरडीसीने या प्रकल्पादरम्यान निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नाही, अशा स्वरुपाच्या प्रकल्पाच्या अहवालाची मागणी केली आहे. समृद्धी महामार्गादरम्यान लाखो झाडे कापण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, मुंबई-गोवा एक्सप्रेस-वे तयार करताना निसर्गाला हानी पोहणार नाही याची काळजी घेण्यात येणार असून यासंदर्भातील अहवाल तयार करण्यात येणार आहे. या एक्सप्रेस-वेमुळे कोकण भागातील पर्यटनाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.