Pune : बार्टीकडून मोफत ऑनलाइन सैन्य, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण; अर्जाची प्रक्रिया सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या वतीने सैन्य, पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन मोफत केले जाणार असून 25 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी इच्छूक उमेदवाराला www.barti.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. तसेच ई-बार्टी अ‍ॅप मधील M-governance अंतर्गत पोलिस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर देण्यात येणार आहे

दिवसाला दोन तास ऑनलाइन प्रशिक्षण

पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी बंद राहणार आहेत. पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता चाचणी असे चार अभ्यास घटकाचे दोन तास ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असणार आहेत.

यावर होणार मार्गदर्शन

प्रशिक्षण परस्पर संवादी स्वरुपाचे असणार आहे. यामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त वेळा विचारण्यात येणारे प्रश्न इत्यादी घटकांचा समावेश असणार आहे. तसेच अभ्यास करण्याची पद्धती, वाचन साहित्य, मार्गदर्शकाचे नोट्स याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. बार्टीच्या Barti Online या युट्यूब चॅनलवरुनही हे प्रशिक्षण वर्ग थेट प्रसारीत करण्यात येणार आहेत.

शंकांचे निरसन इ-मेलद्वारे

उमेदवरांच्या शंकांचे निरसन ईमेलद्वारे करण्यात येणार असून बार्टी द्वारे देण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन बार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. बार्टी संस्थेद्वारे आयोजित ऑनलाइन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी आणि समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.