‘लालपरी’च्या प्रवाशांसाठी खुशखबर ! ST महामंडळ परवडणार्‍या दरात घडविणार ‘रामोजी फिल्मसिटी’ची सफर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने रायगड, महाबळेश्वर, लोणावळा दर्शन या विशेष बससेवांपाठोपाठ आता प्रवाशांसाठी रामोजी फिल्मसिटी दर्शन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीची लक्झरी बस प्रवाशांचे सेवेत असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दोन रात्रीच्या मुक्कामासह फिल्मसिटीची सफर घडविण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाकाळात एसटीची वाहतूक सेवा अनेक महिने ठप्प होती. त्यामुळे घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी एसटीकडून पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणांसाठी विशेष सेवा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर पुणे विभागाने महाबळेश्वर, रायगड, लोणावळा, कोकण, अष्टविनायक, गाणगापुर दर्शन या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीचे पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. पुण्यातून अनेक जण सुट्टयांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी फिल्मसिटीमध्ये जातात. याचा विचार करून एसटी प्रशासनाने पुण्यातून रामोजी फिल्मसिटी दर्शन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत पुणे विभागाचे वाहतुक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे म्हणाले, लवकरच रामोजी फिल्मसिटी सेवा सुरू केली जाणार आहे. याबाबत फिल्मसिटीच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. बसचे तिकीट दर, प्रवास मार्ग, तेथील राहण्याची व्यवस्था आदीचे नियोजन केले जात आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या दरातच ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

लवकरच अकरा मारुती दर्शन बससेवा
अष्टविनायक दर्शन या बससेवेप्रमाणे आता अकरा मारूती दर्शन बससेवाही सुरू होणार आहे. प्रत्येक शनिवारी ही बस धावेल. या सेवेचे तिकीट दर, बसची वेळ, प्रवासाचा मार्ग ही माहिती लवकरच प्रवाशांना दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.