पुणेकरांसाठी खुशखबर ! 5 महिन्यांनंतर उद्यापासून PMPML सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुरूवारपासून पुणेकरांची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा होणार आहे. पीएमपीच्या ४२१ गाड्या १९० मार्गांवर धावू लागणार आहे. गुरुवार पहाटे ५ वाजता पहिली डबल बेल वाजेल आणि रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषीत केलेल्या टाळेबंदीमुळे २३ मार्चला पीएमपीएल बंद झाली होती. पीएमपीएल सेवा तब्बल ५ महिने बंदच होती. गुरूवारी बससेवा सुरु होणार असली तरी सरकारने त्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत. पीएमपीएलही कोरोनापासून काळजी म्हणून काही सुविधादेखील देण्यात येणार आहेत.

पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले की, “प्रत्येक बस सॅनीटाईज करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रमुख स्थानकावर संपूर्ण बस सॅनिटाईज केली जाईल. हे काम खासगी संस्थेकडे दिले असून त्यावर पीएमपीएल अधिकाऱ्यांची देखरेख असणार आहे. प्रवाशांसाठी चालकाकडे सॅनिटायझर असेल. प्रवाशांना सुरक्षित अंतर समजावे यासाठी कुठे बसायचे व कुठे बसायचे नाही यावर मार्किंग करण्यात येणार आहे. चालक हा प्रवाशांपासून पूर्ण विलग असेल. त्याच्या आणि प्रवाशांच्या मध्यभागी एक अर्धपारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे.”

राज्य सरकारने फक्त ५० टक्के क्षमतेनेच पीएमपीएल सुरू करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार ४२१ गाड्याच रस्त्यावर धावणार असून १९० मार्गांनी धावणार आहेत. त्यात स्वारगेट, पुणे स्थानक, शिवाजीनगर या प्रमुख स्थानकांपासून शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर ये- जा करणार आहे. असे असले तरीही तिकीटाच्या दरात कोणताही बदल करण्यात नाही.