Pune News : ‘वनाज ते गरवारे’ मेट्रो मार्गाची महिनाभरात होणार चाचणी, कोथरूडला देखील मेट्रो; नागपूरातून 6 डबे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महामेट्रो प्रक्लपांतर्गत पुण्यात सुरु असलेल्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या 5 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी (ट्रायल रन) येत्या महिनाभरात घेण्यात येणार आहे. त्यासाठी मेट्रोच्या तीन डब्यांच्या दोन कोच वनाज डेपोत दाखल झाल्याची माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गांचे काम पुर्णत्वास आणले असून विद्यूत खांब, संगणकीय दिशादर्शक दिवे आदी कामे अंतीम टप्प्यात आहेत. त्यामुळे डब्यांची मागणी केली होती. त्यानुसार 2 गाड्यांचे प्रत्येकी 3 असे सहा डबे वनाज डेपोत दाखल झाले आहेत. नागपूर मेट्रोसाठीचे हे डबे असून ते फक्त चाचणीसाठी वापरले जाणार आहेत. पुण्यातील दोन्ही मार्गांवरील मेट्रोचे डबे इटलीतील कारखान्यातून येणार असून ते विशेष प्रकारच्या हलक्या पण कडक अशा धातूपासून बनवले आहेत. चाचणीपूर्व तयारीला महिनाभर लागणार आहे. ऊन्नत मार्गावरील काही किरकोळ पण मेट्रो धावण्यासाठी महत्वाची असलेली कामे सुरु असून ती त्वरीत करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला केल्या आहेत. मार्गावरील सर्व स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय, आयडीयल कॉलनी, आनंदनगर या स्थानकांचे काम आता 60 टक्के झाले आहे. छत व अन्य कामेही तातडीने, जास्तीचे मजूर लावून करण्यात येत असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.