पोलीसाने पत्नीला घरातून ‘हाकलून’ दिले, 9 महिन्याच्या बाळासाठी आईची ‘धावपळ’, भुमाता संघटनेने केली ‘मदत’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  पतीने आणि सासरच्या मंडळीने विवाहितेला मारहाण करत घरातून हाकलून दिल्याची घटना 10 जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथे घडली होती. 9 महिन्याचे बाळ देखील विवाहितेकडून हिसकावून घेण्यात आले होते. योगेश संपत साळवी असे विवाहितेच्या पतीचे नाव असून ते पुणे येथील कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे.

विवाहितेला घरातून बाहेर काढल्यानंतर 9 महिन्याच्या बाळासाठी तिचा जीव कासावीस होत होता. बाळाला मिळवण्यासाठी विवाहिता जेजुरी पोलीस ठाण्यात गेली. तेथे तक्रार दाखल केली. मात्र बाळाचा ताबा मिळाला नाही. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालय गाठले. तिथे विवाहितेला कोर्टातून बाळाचा ताबा घेण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने भूमाता संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष परवीन पानसरे यांची भेट घेतली. पानसरे यांनी महिलेसोबत जेजुरीला येऊन तेथे तक्रार दाखल केली. तेथेही कोर्टातून ताबा घेण्यास सांगितले. त्यानंतर वकिलांशी संपर्क साधून बाळाचा ताबा मिळण्यासाठी कोर्टात मागणी केली. कोर्टाने नोटीस बजावली आणि अखेर महिलेला बाळाचा ताबा मिळाला.

बाळाचा ताबा मिळवून देण्यासाठी ॲड. कुंभारकर पाटील, ॲड. पंकज बोरावके तसेच परवीन पानसरे, कल्पना जाधव, छाया नानगुडे यांनी मदत केली. या कार्याबद्दल भुमाता संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –