BSNL ग्राहकांना देणार 4G सर्व्हिस ; 2GB चा डेटाही मोफत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनेच 8-9 वर्षांपूर्वीच थ्रीजी सेवा देशात पहिल्यांदा देण्यात सुरुवात केली होती. मात्र, 4G सेवा देण्यास बीएसएनएल मागे पडली. जिओने 4G सेवा सुरु करून दोन वर्षे झाली तरीही बीएसएनएल अद्याप ही सेवा सुरु करू शकली नव्हती. आता बीएसएनएल लवकरच देशभरात 4G सेवा सुरु करणार असून सध्याच्या ग्राहकांना 4G सिम देण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये कंपनीने 2100MHz स्पेक्ट्रम घेतले आहेत. सध्या प्राथमिक स्तरावर केरळच्या इदुकी जिल्ह्यात 4G सेवा दिली जात असून चेन्नईमध्येही 4G सिम देण्य़ास सुरुवात करण्यात आली आहे.
बीएसएनएलला 2100 MHz बँडवर 4G सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला आहे. कंपनी सध्या या बँडवर 3G सेवा देत आहे. बीएसएनएल ग्राहकांना आपले सिम कार्ड 4G मध्ये अपग्रेड करावे लागणार आहे. कंपनी यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नसून 2GB डेटाही देत आहे.
बीएसएनएलने या सर्कलमध्ये 4G ची चाचणी घेण्यासाठी सेवा सुरू केली आहे. यासाठी बीएसएनएल ने NOKIA सह करार केला आहे. नोकिया आणि भारत दूरसंचार निगम लिमिटेड संयुक्तीकरित्या देशातील १० सर्कलमध्ये 4G ची चाचणी करणार आहेत. बीएसएनएलने गेल्या महिन्यात गुजरातमध्ये 4G सेवेची टेस्टिंग सुरू केली होती. येत्या काळात कंपनी देशातील अन्य १९ टेलिकॉम सर्कलमध्ये 4G सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.
चेन्नई सर्कलसाठी 4G सिमसोबत 2 जीबीचा डेटा दिला जात आहे. हे सिम घेण्यासाठी 20 रुपये आकारले जात आहेत. तर गुजरातच्या गांधीधाम आणि अंजर भागात 26 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर 3G सेवा मिळणार नाही. मात्र, 2Gसेवा सुरु राहणार आहे. येत्या सहामाहिमध्ये कंपनी देशभरात 4G सेवा सुरु करणार आहे.