मद्यपींना खुषखबर… सरकारने काढलाय नवा अध्यादेश

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन-तळीरामांसाठी ऐन थंडीत शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे. देशी दारू दुकाने आता सकाळी दहाऐवजी आठ वाजताच उघडण्याचा नवा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्यामुळे तळीरामांवर शासन फिदा झाल्याची चर्चा आहे.

दि. 3 नोव्हेंबर रोजी हा अध्यादेश काढण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय, राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील सर्व दारू दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने त्यावर म्हणणे मांडून तो निर्णय शिथील करण्यात आला. नंतर महापालिका, नगरपालिका हद्दीतील दुकानांना त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे शासन तळीरामांसह मद्यविक्रेत्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले होते. आता शासनाने देशी दारू दुकाने सकाळी दहाऐवजी आठ वाजता सुरू करण्याचा नवा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे हे शासन तळीरामांवर फिदा असल्याची चर्चा आहे.

पूर्वी क वर्ग नगरपालिकांसह ग्रामीण भागात हद्दीत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत  देशी दारू दुकान सुरू करण्यास परवानगी होती. तर ब वर्ग नगरपालिकांसह महापालिकांच्या हद्दीत सकाळी दहा ते रात्री बारापर्यंत देशी दारू दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. आता शासनाने काढलेल्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात सकाळी आठ वाजता देशी दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळी दहा ते रात्री हा या वेळेतच ही दुकाने सुरू राहतील असेही आदेशात म्हटले आहे.