Google नं ‘कोरोना’ वॉरियर्सना विशेष प्रकारे केलं सन्मानित, डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला दिला ‘धन्यवाद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेक कंपनी गुगल प्रत्येक खास प्रसंगी Doodle बनवते. आता कंपनीने आणखी एक डूडल बनवले आहे, जे विशेषतः कोरोना वॉरियर्ससाठी आहे. गुगलने कोरोनाविरूद्ध लढाई लढणार्‍या लोकांना आपले डूडल समर्पित केले आहे. तसेच कंपनीने या डूडलद्वारे फ्रंट-लाइनर कोरोना वॉरियर्स डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. गुगलने म्हटले आहे की, सध्या जगभरातील लोक या महामारीशी लढत आहेत. तसेच लोक हा धोकादायक संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांना मदत करत आहेत. आशा आहे की, लवकरच या महामारीचा नाश होईल.

कोरोना रोखण्यासाठी बनवले गेले डुडल
गुगलने ऑगस्टमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एक खास डूडल बनवले होते. या डूडलमध्ये मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्यात कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली होती. या अ‍ॅनिमेटेड डूडलमध्ये प्रत्येक अल्फाबेटला मास्कने कव्हर केले होते आणि अ‍ॅनिमेशनच्या शेवटी प्रत्येक अल्फाबेटला दूर करून सामाजिक अंतराचे अनुसरण करण्याचा सल्ला दिला गेला होता.

यापूर्वीही गुगलने कोरोना संक्रमणानबाबत अनेक डूडल्स बनवले होते. या सर्व डूडलच्या माध्यमातून शिक्षक, फूड सर्व्हिस कर्मचारी, पॅकिंग व शिपिंग कर्मचारी आणि किराणा कामगार यांचा सन्मान करण्यात आला होता. या व्यतिरिक्त कंपनीने एक डूडल तयार केले होते, ज्यामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या गेल्या होत्या.

भारतात कोरोना विषाणूची ताजी परिस्थिती
भारतात कोरोना प्रकरणांची संख्या ४७,५४,३५६ वर पोहोचली आहे. ९४,३७२ नवीन प्रकरणे आढळली आहेत. आतापर्यंत ३७,०२,५९५ लोक कोरोना मुक्त झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत १,११४ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. देशात रिकव्हरी रेट ७७.८८ टक्के आहे.