ड्रायव्हिंगच्या दरम्यान Google Map चा करू नका वापर, खिशाला पडू शकते महागात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात कुणाला मार्ग विचारण्याऐवजी नेव्हिगेशनद्वारे इच्छित स्थळी पोहचणे लोक पसंत करतात. याच कारणामुळे गुगल मॅपचा वापर वाढत आहे. परंतु जर तुम्ही ड्रायव्हिंग करताना हातात मोबाईल घेऊन गुगल मॅपचा वापर करत असाल तर हे तुमच्या खिशाला महागात पडू शकते.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एका व्यक्तीचे चलान पोलिसाने फाडले. कार चालकाचे म्हणणे होते की, तो कुणाशीही बोलत नव्हता, तर त्याचे चलान का फाडले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मोबाइल होल्डरऐवजी डॅशबोर्ड किंवा हातात पकडून गुगल मॅपचा वापर करणे वाहतुकीच्या नियमांच्या विरूद्ध आहे कारण असे करण्याने ड्रायव्हिंग दरम्यान लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. हे प्रकरण बेजबाबदारपणे ड्रायव्हिंगच्या श्रेणीत येते.

होऊ शकतो 5 हजारांचा दंड
सामान्यपणे लोक ड्रायव्हिंगच्या दरम्यान गुगल मॅपचे नेव्हिगेशन ऑन करतात. याद्वारे मार्ग समजतो, आणि जर कुठे ट्रॅफिक जाम असेल तर त्याचीही माहिती मिळते. योग्यवेळी दुसरा मार्ग निवडता येतो. हे सर्व गुगल मॅपचे फायदे आहेत, परंतु काही तोटे सुद्धा आहेत. तुम्ही जर गाडीमध्ये डॅश बोर्डवर मोबाईल होल्डर लावलेला नसेल आणि हातात मोबाईल घेऊन गुगल मॅपचा वापर करत असाल तर मोटर वाहन कायदा 2020 मध्ये 5 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

मोबाईल होल्डर लावणे लाभदायक
जर तुम्ही ड्रायव्हिंग करताना गुगल मॅपचा वापर करत असाल तर यासाठी आपल्या वाहनात मोाबईल होल्डर फिट करा. मोबाईल होल्डरमध्ये फोन लावून गुगल मॅपचा वापर करणे कायद्याचे उल्लंघन मानले जात नाही. मोबाईल होल्डर बाईकमध्ये 200 रुपयांपर्यंत आणि कारमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत लावता येते. जर तुम्ही वेळीच मोबाईल होल्डर फिट केले तर 1 हजार रुपयांचा खर्च करून 5 हजार रुपयांच्या दंडापासून वाचू शकता.