‘सरळ पुढं जाऊन उजव्या बाजूला वळा अन्…; आता Google Map मराठीसह 10 स्थानिक भाषेत, इंग्रजी न येणार्‍यांना मोठा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय युजर्सच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेऊन गुगलने आता गुगल मॅपची सेवा 10 स्थानिक भाषेतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल मॅप केवळ इंग्रजी भाषेतच लोकेशन दाखवत असल्याने इंग्रजी न येणाऱ्या युजर्संना अडचणी येत होत्या. त्यामुळे युजर्सची ही अडचण दूर करण्यासाठी गुगलने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू या 10 भाषांमध्ये गुगल मॅपची सेवा वापरता येणार आहे. त्यामुळे गुगल मॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. टेक कंपन्यांसाठी भारतीय युजर्स महत्त्वाचे आहेत. त्यांना भारतीय युजर्सच्या गरजांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यामुळे कंपनीने गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्याची घोषणा केली.

इंग्रजी न येणाऱ्या युजर्संना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना आपल्या भाषेतही गुगल मॅप वापर करता येणार आहे. त्यामुळे एखादा पत्ता शोधताना येणाऱ्या अडचणी त्यांना यापुढे येणार नाहीत. गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे.