Zomato आणि Swiggy होणार बॅन ? Google Play स्टोअरकडून पाठवण्यात आली नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या Zomato आणि Swiggy या ॲप्सच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. या दोन्ही ॲप्सना गुगलकडून प्ले स्टोअर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस देण्यात आली आहे. दोन्ही अ‍ॅप्सना त्यांच्या अ‍ॅपमध्ये खेळाचे फिचर जोडल्यामुळे हि नोटीस बजावण्यात आली आहे. Zomato आणि Swiggy यांच्या आधी 18 सप्टेंबर रोजी गुगलकडून डिजिटल पेमेंट कंपनी Paytm ला प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले होते. गुगलकडून पेटीएमवर स्पोर्ट्स बेटिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही तासांनंतर Paytm ॲप पुन्हा प्ले स्टोअरवर आले.

नोटीस मिळाल्याचे Zomatoकडून मान्य करण्यात आलं आहे. मात्र त्यांच्याकडून यास ‘अन्यायकारक’ असे म्हणण्यात आले आहे. Zomatoच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे कि “हो, आम्हाला Google कडून एक सूचना प्राप्त झाली आहे. आम्हाला विश्वास आहे की ही अयोग्य सूचना आहे, मात्र आम्ही एक छोटी कंपनी आहोत आणि आम्ही Google च्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आमची व्यवसाय रणनीती तयार केली आहे”.Zomatoकडून आयपीएलच्या पार्श्वभुमीवर ‘जोमाटो प्रीमियर लीग’चे आयोजन करण्यात येणार आहे.

मात्र Swiggyने या नोटिसीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र कंपनीकडून आपले स्पोर्ट्स फिचर थांबवण्यात आले आहे. या विषयावर दोन्ही ॲप्सचे गूगलशी बोलणे चालू आहे. गुगलकडून यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया देण्यात आली नाही. बर्‍याच कंपन्यांना सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये संधीचे भांडवल करायचे आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढविण्यासाठी अ‍ॅपमध्ये गेम्स फिचर जोडण्यात येत आहेत.