UP : विनयभंग करणार्‍यानेच मुलीच्या वडिलांवर केले कुर्‍हाडीने वार

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेश गुन्हेगारीच्या घटनेने चर्चेत आला आहे. पत्रकारांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेपासून उत्तर प्रदेशातील हत्याचे सत्र सुरूच असून, मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली म्हणून आरोपीने मुलीच्या वडिलांची कुर्‍हाडीने वार करून खून केला आहे. कन्नोज जिल्ह्यातील छिबरामऊ येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.

कन्नोज जिल्ह्यातील छिबरामऊ क्षेत्रात येणार्‍या चिलमलैया गावात ही घटना घडली. 50 वर्षीय रणवीर यांचा पाणी भरण्यावरून गावातीलच श्याम लाल यांच्यासोबत जुना वाद आहे. या जुन्या वादातूनच आरोपी श्याम लालने रणवीर यांच्या मुलीची छेडछाड काढली होती. रणवीर यांनी पोलिसांत तक्रार केल्याचे कळल्यानंतर श्याम लाल यांनी कुर्‍हाडीने रणवीर यांच्यावर हल्ला केला. वडिलांवर कुर्‍हाडीनं हल्ला करत असल्याचं बघून रणवीर यांच्या मुली त्यांना वाचवण्यासाठी धावल्या. मात्र, श्याम लाल यांनी मुलींवरही वार केले. या भयंकर घटनेत रणवीस यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या दोन्ही मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रणवीर यांचा मृतदेह ताब्यात घेतला.