home page top 1

काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य ; काँग्रेसच्या ‘या’ प्रवक्त्यांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं होत. मात्र त्यांच्यावरची कारवाई मागे घेत त्यांची पदावर वर्णी करण्यात आली. याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी एक ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हंटल आहे की, ‘काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जातं. मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.’ या संदर्भातलं एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केलं आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं आहे.

रिट्विट केलेल्या या पत्रात त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधातील कारवाई मागे घेतल्याचे सांगितले आहे. प्रियंका चतुर्वेदी ज्यावेळी राफेल डीलबद्दल पत्रकार परिषद घेण्यास आल्या होत्या, त्यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये प्रियंका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशातील या काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या शिफारशीनंतर ही कारवाई मागे घेण्यातआली असून आता त्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे.

Loading...
You might also like