पोलीस व्हॅनमध्येच तडीपार गुंडाकडून TikTok व्हिडिओ ; सर्वत्र खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस व्हॅनमध्ये एका कुख्यात गुंडाने टिक टॉक व्हिडिओ बनविला असून गुंडाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

आपली इज्जत वाचविण्यासाठी कोराडी पोलिसांनी कुख्यात गुंड सैय्यद मोबीन अहमद (रा. संघर्ष नगर, टिपू सुलतान चौक) याच्याविरुद्ध शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मोबीन हा चामा टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून सध्या तो तडीपारसुद्धा आहे.

काही दिवसांपूर्वी मोबीनचा भाऊ सेबू याला यशोधरानगर पोलिसांनी वाहन चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. चामा टोळी मोठी वाहने चोरुन त्याचा जनावरांच्या तस्करीसाठी वापर करतो. पोलिसांनी वाहन पकडल्यास चालक पळून जातो. वाहन चोरीचे असल्याने चामा टोळीचे नुकसान होत नाही. मोबीनची टोळी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जनावरे चोरण्याची कामे करतात. ही चोरलेली जनावरे आदिलाबाद येथे कत्तलीसाठी विकली जातात. मोबीनची अनेक वाहने पोलिसांनी आतापर्यंत जप्त केली आहे. त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

या गुंडाला पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला मोबाईल वापरू दिला. या व्हिडिओमध्ये तो पोलीस व्हॅनमधून खाली उतरताना दिसत आहे. तसेच पोलीस व्हॅनच्या सभोवती फेरी मारताना दिसतो. कोराडी परिसरात हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे. त्याचा हा ‘टिक टॉक’ व्हिडिओ त्याच्या गुंड साथीदारांनी सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामुळे पोलिसांवर एकच टिका सुरु झाली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता ज्या पोलिसांनी या गुंडाला हा व्हिडिओ बनविण्याची परवानगी दिली. त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading...
You might also like