….राज्यातील कारभारी अपयशी, म्हणूून पवारांना बांधावर जाव लागतय ,आमदार गोपीचंद पडळकर यांचे टिकास्त्र

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. वयाच्या 79 व्या वर्षीसुद्धा पवार नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्यानं अनेकांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. तर भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

पवार यांना या वयात बांधावर जावे लागत आहे. हेच या महाआघाडीचं अपयश असल्याची टीका आमदार पडळकरांनी केली आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागतेय. पवार हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. मागचा दौरादरम्यान पवार हे विरोधी पक्षात होते तेंव्हा त्यांनी दौरा केला होता. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत आहे.

दुसरीकडे अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं. अशात आपल्या बळीराजाला धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. कोरोनाच्या संसर्गातही जिवाची पर्वा न करता शरद पवार हे बळीराजाच्या भेटीसाठी जात आहेत. आज तुळजापूरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.

यानंतर लोहारा, काकांब्रा, सास्तूर या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. या गावांना भेटी देताना पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली. पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना पवार यांनी शेतकऱ्यांना केली.

शरद पवार रविवार आणि सोमवार हे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.