‘वंचित’ला मोठा धक्‍का ? गोपीचंद पडळकर भाजपच्या वाटेवर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून लवकरच ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत. जत किंवा खानापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दसऱ्यापूर्वीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पडळकर यांच्याबद्दल वेगवेगळे तर्क लावण्यात येत होते. ते काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष होते. असे असताना त्यांनी आज आपला निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात ते भाजपवासी होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात वंचितच्या झालेल्या मेळाव्यात ते सहभागी झाले नव्हते. यावेळी अनेक तर्क लावले गेले.

ते सांगोल्यातून उभे राहतील असे म्हटले जात होते. कधी ते शिवसेनेत जाण्याचे बोलले गेले तर कधी ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले गेले. कधी ते वेगळा पक्ष काढून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जातील असेही म्हटले जात होते. अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 साली भाजपच्या तिकीटावर लढलेले पडळकर पुन्हा भाजपमध्ये जात आहेत.

पडळकरांच्या रुपाने वंचितला नवीन चेहरा मिळाला अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु गोपीचंद पडळकर वंचितपासून कधी वंचित झाले हे समजलेही नाही. पडळकरांना सोबत घेतले म्हणून लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांवर टीका करत पक्षाला रामराम ठेकला होता. आता पडळकरही पक्षातून बाहेर पडले आहेत.