‘कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता?’ गोपीचंद पडळकरांचे भाई जगताप यांना सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या तर काही रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने MPSC परीक्षा रद्द करण्यात आल्या. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. आता UPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी गोपीपंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. आता भाई जगताप यांना पडळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते भाई जगताप

MPSC परीक्षा स्थगित केल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे गेले ? असा थेट सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. जगताप यांनी ट्विट करत यावर टीका केली आहे. एमपीएसी परीक्षा स्थगित केल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. यावरुन जगताप यांनी भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

भाई जगताप यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे, राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकराने UPSC ची परीक्षा स्थगित केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बीळात जाऊन लपले आहेत ? आता दातखिळी बसली आहे का ? अशा शब्दात जगताप यांनी पडळकर यांच्या टीकास्त्र सोडले.

पडळकरांचे जगतापांना उत्तर

भाई जगताप यांनी ट्विट करुन गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केल्यानंतर पडळकर यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. नाव बदलल्याने जसं #भाई होता येत नाही तसंच माझ्या माहाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येणार नाही… काल चक्रीवादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता ?, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाई जगताप आणि पडळकर यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगल्याचे पहायला मिळत असून सध्या याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.