गोपीनाथ मुडेंचं अपघाती निधन होऊच शकत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. यातच आता धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचे अपघाती निधन होऊच शकत नाही असे म्हंटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
याबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, ‘गोपीनाथ मुंडे माझे काका होते. आमचे रक्ताचे नाते होते. सीबीआयच्या अहवालात त्यांचा मृत्यू अपघाती असल्याचे समोर आले. त्यामुळे तो मान्य करणे साहजिकच आहे. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं त्यावर समाधान झालं नाही असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. यावेळी गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघाती नाही तर तो घातपात होता असा संशयही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मुंडेंच्या हत्येची चौकशी करणार : जयंत पाटील
याबाबत बोलताना पाटील म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली हे सांगितले जात आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी झाली पाहिजे. दिल्लीत झालेल्या अपघातात चालकाची चूक होती तर त्याला शिक्षा का झाली नाही. की तो अपघात घडवण्यात आला याबद्दल संशय व्यक्त होत आहे असे सांगतानाच राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर त्यांच्या मृत्यूची चौकशी करणार असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे. तुम्हाला फसवणारी टोळी दिल्लीत आणि राज्यात आली आहे आणि हीच टोळी घालवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केलं.

माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन : पंकजा मुंडे
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येबाबत पंकजा मुंडे यांनी”यावर काय बोलावं हा प्रश्न आहे. मी हॅकर नाही. एक कन्या आहे. या सगळ्या गोष्टींचं राजकीय भांडवलं मला करायचं नाही. या सगळ्या प्रकरणामुळे मानसिक त्रासातून कुटुंबियांना जावं लागत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांना मी स्वतः सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली आहे”. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती.

बीड मधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ‘माझ्या बापाला काही झाला असेल तर मी त्याचा जीव घेईन मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही. त्यानंतर माझा जीव जगाच्या जागी जाईल असे वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका असेही पंकजा मुंडे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाल्या होत्या.