सुरेश धस यांच्या उमेदवारीने गोपीनाथ मुंडेंचे समर्थक अस्वस्थ

बीड : पोलीसनामा ऑनलाईन
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपमधील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गोपीनाथ मुंडे यांना विरोध करणाऱ्या धस यांना उमेदवारी दिल्याने भाजप मधील मुंडेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे धसांना उमेदवारी मिळाली असली तरी त्यांच्या विजयाचा मार्ग खडतर झाल्याची चर्चा आहे.

सुरेश धस यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशी दगाफटका करत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये राज्यमंत्री झाले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनांनंतर धस यांनी भाजपला जिल्हा परिषदेत मदत करत सत्ता स्थापन करायची संधी निर्माण करून दिली. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना बाहेरचा रस्ता धरायला लावला. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजप प्रवेश लांबत राहिल्याने धस हे मधल्या काळात अस्वस्थ असल्याचे समर्थकांकडून बोलले जात होते. परंतु आता भाजपने त्यांना जिल्हा परिषदेत केलेल्या मदतीची परतफेड विधान परिषदेची उमेदवारी देऊन केली आहे.

एकीकडे पंकजा मुंडे यांनीच ही उमेदवारी मिळवून दिल्याने मुंडे समर्थक मात्र संतापलेले आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असताना धस यांनी मुंडेंवर केलेली जहरी टीका मुंडे समर्थक विसरू शकत नाहीत. त्यामुळेच पंकजा यांनी उमेदवारी मिळवून दिली असली तरी कार्यकर्ते मात्र धस यांना मदत करतील असे वातावरण नाही. त्यातच पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक राहुल कराड यांना डावलल्याने नाराज होऊन भाजपला रामराम करत धनंजय मुंडे यांचा हात धरला आहे. त्यामुळे राहुल कराड यांच्यामागे असलेला जनाधार पाहता धस यांना येथे विजय मिळवणे कठीण आहे.

दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे निवडणुकीत सुरेश धस यांचा पराभव निश्चितच मानला जात आहे. लातूरचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची अर्ज दाखल करतानाची अनुपस्थिती धस यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

संबंधित घडामोडी:
भाजपला मोठा धक्का, लातूरचे भाजपचे नेते रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
मुंडेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय : धनंजय मुंडे