हिंदूत्ववादी नेता रंजीत बच्चन यांचे झाले होते 3 लग्न, गोरखपुरमध्ये बलात्काराचा FIR ही दाखल

लखनऊ : वृत्तसंस्था – विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची रविवारी सकाळी गोळी मारुन हत्या केली गेली. पोलीस या हत्याकांडाचा तपास करत आहेत. माहितीनुसार रंजीत बच्चन यांनी तीन विवाह केले होते. रंजीत यांनी पहिला विवाह कुटूंबाच्या सल्ल्याने केला होता. त्यानंतर पहिल्या पत्नीपासून ते वेगळे झाले. त्यांनी 2002 पासून 2009 दरम्यान सायकल प्रवासादरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या कालिंदी शर्माशी दुसरा विवाह केला. त्यानंतर रंजीत बच्चन यांनी काही वर्षापूर्वी लखनऊच्या एका अधिकाऱ्यांच्या मुलीशी निर्मला श्रीवास्तवशी तिसरा विवाह केला होता. सुरुवातीला कालिंदी शर्मा आणि निर्मला श्रीवास्तव यांच्यात वाद झाला होता. परंतु दोघींमध्ये सहमतीनंतर त्या सोबत रहायला लागल्या.

गोरखपूरमध्ये छेडछाड आणि बलात्कारांची एफआयआर दाखल –
2017 मध्ये दुसरी पत्नी कालिंदी शर्माच्या बहिणीने रंजीत बच्चन यांच्यावर छेडछाड आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा गोरखपूरच्या शाहपूर ठाण्यात दाखल केला गेला होता. पीडितेचा आरोप होता की रंजीत बच्चन त्यांच्या आई वडीलांद्वारे तिची मारहाण करत होते. घटनेनंतर पोलिसांची एक टीम या गुन्ह्याचा तपास करत होती.

कोण आहे रंजीत बच्चन –
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन भारतेंदू नाट्य अकादमीमधून 2010 मध्ये ग्रेडेड आर्टिस्ट होते. सध्या गुलरहियाच्या टोला पतरकामध्ये राहत होते. जवळपास 18 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. तर भारत आणि भूतान सायकल प्रवासादरम्यान दलाचे नेतृत्व ते करत होते. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले. त्यांनी भारतीय सोशल वेलफेअर फांऊडेशन गोरखपूरची स्थापना केली होती.

सीसीटीव्ही फुटेज –
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन संशयितांचे स्केच जारी करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या व्यक्तींची माहिती देणाऱ्यांना 50 हजार रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. पोलीस कमिश्नर सुजीत पांडेय म्हणाले की दोन संशयितांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहण्यात आले आहे. एका संशयिताने आपला चेहरा झाकलेला होता. संशयिताची माहिती देणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

नाकावर मारली होती गोळी –
रंजीत बच्चन यांच्या पोस्टमार्टममध्ये स्पष्ट झाले की हल्लेखोरांनी त्यांच्या नाकावर अत्यंत जवळून गोळी झाडली होती. जास्त रक्त वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अहवालात 9 एमएमच्या पिस्तुलातून गोळी झाडल्याचा संशय आहे.