प्रशासन नरमले, कलाकेंद्र बंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – तब्बल सात दिवस ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर प्रशासन नरमले. जामखेड तालुक्यातील मोहा परिसरातील कला केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. सलग सात दिवस उपोषण सुरू असल्याने काही ग्रामस्थांची प्रकृती खालावली होती.

अपर जिल्हाधिकार्‍यांनी जामखेड तालुक्यातील मोहा परिसरातील कला केंद्रांचे परवाने निलंबित केले होते. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने सदर कला केंद्रांना परवानगी दिली होती. त्यानंतर मोहा व परिसरातील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या दबावामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधितांना परवानगी दिली, असा आरोप केला जाऊ लागला होता. उपोषणाच्या सातव्या दिवशी नऊ जणांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे संबंधितांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती खालावल्यानंतरही आंदोलक उपोषणावर ठाम होते. उपोषण मागे घेतले जात नव्हते. अखेर शुक्रवारी जिल्हा प्रशासन नरमले.

 ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत कला केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर ग्रामस्थांनी सरबत पिऊन उपोषण मागे घेतले. तब्बल सात दिवस हे उपोषण सुरू होते.

दरम्यान ग्रामस्थांनी कला केंद्राच्या विरोधात भूमिका घेतली असताना कलाकेंद्रांच्या चालकांनी कलाकेंद्र समोरच उपोषण सुरू करून गावकऱ्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थ त्यांच्या मागणीवर ठाम होते. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिका पुढे नमते घेत जिल्हा प्रशासनाने सदर कलाकेंदेरांचे परवाने निलंबित केले.