सर्वात मोठी बातमी ! राज्यपालांकडून शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण, दिली ‘एवढी’ वेळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपानं सत्ता स्थापन करू शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर काही तासातच राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं असून उद्या (सोमवार) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता राजकीय हलचालींना प्रचंड वेग आला आहे. आता शिवसेना काय करते याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

राज्यपालांनी शनिवारी भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण देवुन दि. 11 नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून तेढ निर्माण झाली आणि बहुमताचा आकडा जवळ नसल्याने भाजपाने सत्ता स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, विनोद तावडे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी राज्यपालांची भेट घेवुन भाजप राज्यात सत्तास्थापन करू शकत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपाच्या सर्वबाबी सांगुन शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राष्ट्रवादीनं त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी शिवसेनेनं सर्वप्रथम एनडीएमधून बाहेर पडावं आणि त्यानंतर फॉर्म्युला निघू शकतो असं सांगितलं.

दुसरीकडे जयपुरमध्ये काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करीत आहेत. काँग्रेसनं अद्यापही कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमच्याकडे जनमत नसल्याची प्रतिक्रिया या वृत्तवाहिनीला दिली. त्यामुळे आता जे काही करायचे आहे ते सर्व शिवसेनेला करायचे आहे. शिवसेना नेमकं काय करणार हे उद्या समजणार आहे. राज्यपालांकडून उद्या संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com