मोठी बातमी ! राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (NPS) 3.46 कोटी खातेदारांना ‘मुदत’पुर्व पैसे काढण्यास परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे जनतेसमोर येणारी आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. या दिशेने सरकारने शुक्रवारी एनपीएस (राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना) ग्राहकांच्या हितासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. या कठीण काळात कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी सरकारने एनपीएस खातेधारकांना थोडे पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. सरकारने 25 मार्चपासून देशभरात 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लागू केला आहे. या कालावधीत, आवश्यक सेवा आणि वस्तू वगळता सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक कामे ठप्प झाली आहेत.

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) शुक्रवारी म्हटले आहे की, एनपीएस खातेधारकांना कोरोना विषाणूच्या उपचारांशी संबंधित खर्चासाठी आंशिक पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल. प्राधिकरणाने सर्व एनपीएस अंशधारक आणि खातेधारकांना सांगितले की, ‘सरकारने कोरोना विषाणूला प्राणघातक महामारी मानले आहे. म्हणूनच, या आजाराच्या उपचारासाठी खातेदारांना थोडे पैसे काढण्याची मुभा दिली जाईल. ही परवानगी खातेदार, त्यांची मुले, जोडीदार आणि पालक यांना आवश्यक असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी देखील दिले जाईल.’

प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, अटल निवृत्तीवेतन योजनेच्या (एपीवाय) ग्राहकांना आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. प्राधिकरणाने सांगितले की, ‘अटल निवृत्तीवेतन योजनेच्या ग्राहकांना आंशिक पैसे काढण्याची आत्ता परवानगी नाही.’

एनपीएस आणि एपीवाय दोन्ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणांतर्गत आहेत. 31 मार्चपर्यंत या दोन्ही योजनांच्या खातेदारांची एकूण संख्या 3.46 कोटी होती. अटल पेन्शन योजनेच्या खातेदारांची संख्या 2.11 कोटी होती.