UNCUT Video : विनायक मेंटेंचा महाविकासवर हल्लाबोल, म्हणाले – ‘मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी सरकारनं एजंट नेमले’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण विषयी मुख्यमंत्र्यांनी सर्व मराठा संघटनांना बोलावून बैठक घ्यावी. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत (एससीबीस) आरक्षण मिळावे यासाठी येत्या 25 जानेवारी पासून सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. यासाठी मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने नक्की काय तयारी केली आहे ? वकील जास्त देणार आहेत का ? याबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि मराठा समाजाला विश्वासात घेऊन तयारी करावी अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री बोलावतील त्या बैठकीला मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार मेटे यांनी केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव शेखर पवार, प्रदेश संघटक तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, सचिन निकम उपस्थित होते.

मेटे पुढे म्हणाले, मी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतीत पत्र लिहिले आहे. त्या अनुषंगाने सर्व मराठा समाजाच्या संघटनांना बैठकीला एकत्र बोलवावे. सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्युएस) म्हणून आरक्षण देण्याबाबत गेल्या 23 डिसेंबरला जो अध्यादेश काढला आहे, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी दुरुस्त करून नवीन अध्यादेश काढावा. या अद्यादेशामुळे मराठा समाजाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंका दूर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एसईबीसीचे आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजाला ईडब्ल्युएसचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट व्हायला हवे. तसे प्रतिज्ञापत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात द्यावे.

राज्य शासनाच्या वतीने विविध विभागात मेगा भारती केली जाणार आहे. परंतु, येत्या 25 जानेवारी पासून मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण मिळावे यासाठीची सुनावणी सलग होणार असून ती जास्तीत जास्त दोन महिन्यापर्यंत चालेल. त्यामुळे राज्य शासनाने ही मेगा भरती न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत स्थगित करावी, मराठा आंदोलनात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, कोपर्डी आणि रोहा येथील घटनेतील आरोपींना त्वरीत शिक्षा करावी अशी मागणी ही मेटे यांनी यावेळी केले.