‘मिरा-भाईंदर-वसई-विरार’ पोलिस आयुक्‍तालयास शासनाची मान्यता ! ठाणे ग्रामीण आणि पालघरचं ‘विभाजन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मिरा-भाईंदर-वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण तसेच अस्तित्वात असलेले छोटे-मोठे उद्योगधंदे आणि कामगारांची वाढती लोकसंख्या लक्षात घेवुन राज्य शासनाने ठाणे ग्रामीण आणि पालघरचे विभाजन करून स्वतंत्र नवीन मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्‍तालय निर्माण करण्यास आज (शुक्रवारी) मान्यता दिली आहे.

मिरा-भाईंदर- आणि वसई-विरार या दोन महानगरपालिकांमध्ये अलिकडील काळांमध्ये गुन्हयांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे ठाणे ग्रामीण आणि पालघरचे विभाजन करून स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय निर्माण करण्यात आले आहे. स्वतंत्र मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्‍तालय प्रत्यक्षात सुरू करण्याची तारीख नंतर घोषित करण्यात येणार आहे.

शासनाने मिरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्‍तालयाबाबत आज घेतलेले निर्णय

1. ठाणे ग्रामीण पोलिस दल आणि पालघर पोलिस दलातील कार्यक्षेत्राचे विभाजन करून मिरा-भाईंदर-वसई-विरार परिसराकरिता स्वतंत्र मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्‍तलय निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

2. ठाणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील मिरारोड, काशिमिरा, नयाननगर, नवघर, भाईंदर, उत्‍तन ही 6 पोलिस स्टेशन आणि पालघरच्या पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वसई, विरार, नालासोपारा, माणिकपुर, वालीव, अर्नाळा आणि तुळींज ही 7 पोलिस स्टेशन मिळून एकूण 13 पोलिस स्टेशन प्रस्तावित मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्‍तालयात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

3. मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्‍तालयांतर्गत काशीगाव, खारीगाव, पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळींज, नायगाव अशी 7 नवीन पोलिस स्टेशन निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत लवकरच अधिसूचना वेगळयाने निर्गमित करण्यात येणार आहे.

4. पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण आणि पोलिस अधीक्षक, पालघर यांच्या आस्थापनेवरून विविध संवर्गातील तब्बल 2171 पदे तसेच इतर जिल्हयातील आस्थापनेवरून / घटकातून वर्ग होणारी 317 पदे अशी एकूण 2488 पदे मिरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्‍तालयात वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

5. उच्चस्तरीय सचिव समितीने दि. 29 ऑगस्ट 2019 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार नवनिर्मित मिरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्‍तालयाकरिता विविध संवर्गातील एकुण 2164 पदांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 1082 पदांपैकी पोलिस चालकांची 60 पदे वगळून उर्वरित 1022 पदे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

6. मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्‍तालयाचे पोलिस आयुक्‍त हे अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे (एडीजी) दर्जाचे असतील.

7. पोलिस आयुक्‍त ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर आणि पिंपरी-चिंचवड यांच्याप्रमाणेच मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्‍त यांना विविध कायद्यांतर्गत असलेले अधिकार व शक्‍ती यांचा वापर करता येणार आहे.

8. आयुक्‍तालयासाठी पहिल्या टप्प्यातील नव्याने निर्माण करावयाच्या 1022 पदांसाठी अंदाजे येणार्‍या 94 कोटी 62 लाख 34 हजार 460 रूप्ये एवढया खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. इतर खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.