गड किल्ल्यांवर ‘मद्यपान’ कराल तर होईल ‘ही’ शिक्षा, गृहमंत्रालयाने काढला ‘अध्यादेश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातल्या गड किल्ल्यांवर मद्यपान करण्यासाठी सरकारने बंदी घातली असून गृहमंत्र्यांनी तसा अध्यादेश काढला आहे. गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी त्या ठिकाणी मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. राज्य सरकारने गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास 10 हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले लग्न समारंभासाठी देण्याचा विचार राज्य सरकारचा होता. मात्र, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणार यासारखा दिवाळखोरी सारखा विचार कुठलाही नाही, असा टोला राज ठाकरे यांना लगावला होता. गडकिल्ल्यांचे डागडुजी करुन त्यांचे पावित्र्य जपलं पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

राज्यात 350 हून अधिक गडकिल्ले आहेत. हे गड किल्ले इतिहासाच्या साक्षीनं उभे आहेत. त्याच गडकिल्ल्यावर हुल्लडबाज मद्यपान करून धिंगाणा घालतात. त्यामुळे गड किल्ल्यांची विटंबना होते. गड – किल्ल्यांवर मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडकिल्ल्यावर दारू पिण्यास बंदी घातली असून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गड किल्ल्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.