सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली : आ. अनिल गोटे

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्यासारख्या धनगर आमदाराचा धुळे महापालिका निवडणुकीत विश्वासघात केल्यानंतर आता आरक्षण प्रश्नावर सरकारकडून संपुर्ण धनगर समाजचीच फसवणूक केली जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द बदलण्यात मुशरफलाही मागे टाकले आहे, अशा शब्दात आ. अनिल गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. गोटे यांनी म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या अहिल्यापुत्रांची सरकारने फसवणूक केल्याने माझे मन अक्षरक्ष: उद्वीग्न झाले आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीकडून झालेल्या फसवणुकीनंतर धनगर समाजाने आशेने पहावे तरी कुणाकडे आणि विश्वास ठेवावा तरी कुणावर? देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केल्याबाबत लोकसभेत पंचनामा झाल्यानंतर सारवासारव केली जात आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावर धनगर समाजाच्या नेत्यांनी प्राणाची बाजी लावून आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारून बारामतीला तळ ठोकला होता. भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष यांच्यासह पंकजा मुंडे व इतर नेते बारामतीत दाखल झाले होते. कॅबीनेटच्या पहिल्याच बैठकीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तेव्हा दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील सात्विकता आणि निरागसता सत्य मानून समाजाने विश्वास ठेवला. परंतू अहिल्यापुत्रांचा विश्वासघातच झाला आहे.

मराठा समाजाबद्दल गायकवाड समितीचा अहवाल १५ नोव्हेंबर २०१८ ला राज्यशासनाकडे दाखल झाला. त्यानंतर २८ आणि २९ नोव्हेंबरला विधानसभेच्या पटलावर येऊन एकमुखाने मान्यताही मिळाली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आरक्षण लागू झाले. अवघ्या १५ दिवसात हा क्रांतीकारी निर्णय झाला. मात्र मराठा आरक्षणाचा अहवाल येण्यापुर्वी दोन महिने आधी धनगर समाजाचा आरक्षण अहवाल शासनाकडे आलेला असताना त्यावर साधी हालचालदेखील नाही.

त्यामुळे धनगर समाजाची ही फसवणूकच आहे. टिसकडे अहवाल पाठविला असल्याचे सांगीतले जाते. मात्र हा केवळ वेळकाढूपणा आहे, असे आ. गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.