सरकारसाठी दिलासादायक ! ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये GST कलेक्शन 9031 कोटी रूपयांनी वाढलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी)वसूली जुलैच्या तुलनेत 86449 कोटी रुपयांवरून 95480 कोटी रुपयांवर गेली आहे. सीजीएसटी वसुली 15906 कोटी रुपयांवरून 17,741 कोटी रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर एसजीएसटी 21064 कोटी रुपयांवरून 23131 कोटी आणि आयजीएसटी 47,484 कोटी रुपयांवर गेली आहे. सेटलमेंट म्हणून सरकारने सीजीएसटीला 21,260 कोटी तर एसजीएसटीला 16,997 कोटी रुपयांची तरतूद केली. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा कराच्या वसुलीने या आर्थिक वर्षातील सर्वोच्च स्तर गाठला आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये नियमित तोडगा काढल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकूण उत्पन्न सीजीएसटीसाठी 39,001 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 40,128 कोटी रुपये मिळविले आहेत. मागील वर्षातील याच महिन्यात जीएसटी उत्पन्नापेक्षा 4% जास्त आहे.

सप्टेंबरमध्ये वस्तूंच्या आयातीवरील कर 102 टक्के होता आणि गतवर्षी याच महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल 105 टक्के होता. एप्रिलमधील महसूल 32,172 कोटी रुपये, मे (62,151 कोटी रुपये), जून (90,917 कोटी रुपये), जुलै (87,422 कोटी रुपये), ऑगस्ट (86,449 कोटी रुपये) होता.