सरकारचे दिवस भरले आहेत – धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

सरकारच्या विरोधात टाहो फोडणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सरकार पोलिस बळाचा वापर करत असेल, तर समजा सरकारचे दिवस भरले आहेत, पोलिसांच्या दहशतीने दबण्याची गरज नाही असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. युवक प्रदेश पदाधिकारी बैठक, मुंबई प्रदेश कार्यालयात आज (मंगळवार ) पार पडली, यावेळी ते बोलत होते.

पुढे बलताना ते म्हणाले , तरुण म्हणजे सळसळते रक्त, आक्रमकता, समस्यांवर मात करणे. तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या समस्यांवर मात करावी अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. युवकांच्या सलग दुसऱ्या बैठकीलाही प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत. यातून स्पष्ट होते की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भूमिका पक्षासाठी किती महत्वाची आहे. युवकांसाठी काही निर्वाणीचे निर्णय घेण्याची विनंती मुंडे यांनी प्रदेशाध्यक्षांना केली.

२०१४ ला युवकांमुळेच सत्ता परिवर्तन झाले. आज तोच युवक भाजपला कंटाळून गेला आहे. सोशल मीडियावरही ट्रेंड बदलला आहे. त्यामुळेच आता परिवर्तन घडणार आणि या परिवर्तनाच्या लढाईत राष्ट्रवादी युवकांचा वाटा सिंहाचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक बुथ दहा युथ अशी संकल्पना मांडली आहे. त्या संकल्पनेत पंचवीस युवकांचा समावेश करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार राहुल जगताप, आमदार वैभव पिचड, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.