UP : PM मोदींचा मंत्र घेतला मनावर अन् 8 महिन्यात कमावले 138 कोटी

लखनऊ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना महामारी ही एक संधी असून, या संकटास संधीत बदला,’ असे आवाहन केले होते. तेच आवाहन स्वीकारत उत्तर प्रदेश सरकारने संधीचे सोने केले आहे. मागील ८ महिन्यांच्या कालावधीत उत्तर प्रदेश सरकारने १३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सरकारने उत्तर प्रदेश सोबत बाहेर राज्यात जंतुनाशक (सॅनिटायझर) च्या विक्रीतून ही कमाई केल्याची माहिती महसूल विभागाने प्रसिद्ध केली आहे.

२४ मार्च ते १५ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी व लहान गटांनी १७७ लाख लिटर जंतुनाशक (सॅनिटायझर) चे विक्रमी उत्पादन घेतले. त्या माध्यमातून सरकारला १३७ कोटी रुपये मिळाले. यातील ७८.३८ लाख लिटर जंतुनाशक (सॅनिटायझर) ची विक्री अन्य राज्यात करण्यात आली. उत्तर प्रदेशात ८७ लाख लिटर सॅनिटायझर विक्री झाल्याने एकूण १६५.३९ लाख लिटर जंतुनाशक (सॅनिटायझर) ची विक्री करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.

अबकारी विभागाने वेळेत जंतुनाशकाचे (सॅनिटायझर) उत्पादन घेतले आणि बाजरात तात्काळ उपलब्ध होईल, त्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच उत्तर प्रदेश सरकारने जंतुनाशक (सॅनिटायझर) मधून उत्पन्न मिळवून विक्रम रचला. जंतुनाशकच्या (सॅनिटायझर) उत्पादनातून १२,४८४ लाख रुपयांचा जीएसटी आणि ७९४ लाख रुपयांचे परवाना शुल्क विभागाला मिळाल्याचे, राज्याचे मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी सांगितलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक रुग्ण सापडले. त्यातील ४ लाख ९३ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आजवर राज्यात ७ हजार ५२४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. देशभरातील रुग्णसंख्या वाढली असून, ती ९१ लाखांवरती पोहाेचली आहे, तर मृतांचा आकडा १ लाख ३४ हजारांवर गेला आहे.