शासनाची परवागनी : शासकीय कर्मचारी ‘हा’ ड्रेस परिधान करू शकतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 8 डिसेंबर रोजी राज्य सरकारनं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कार्यालयात जीन्स आणि टीशर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लीपर्स घालण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आता आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सरकारनं अंशत: बदल केला आहे. या बदलांनुसार सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स घालण्यास परवागनी देण्यात आली आहे. मात्र कार्यालयात टी शर्ट घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनानं सुधारीत परिपत्रक जारी केलं आहे.

शासनाच्या सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हा ड्रेसकोड तर लागू आहेच, परंतु कंत्राटी तत्वावर कार्यालयात काम करणारे कर्मचारी आणि सल्लागार म्हणून काम करणाऱ्या शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांसाठीच ड्रेसकोड बंधनकारक राहणार आहे.

शासनाच्या पत्रकात काय म्हटलं आहे ?

शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे की, मंत्रालय तसेच सर्व शासकीय कार्यालयांमधून सरकारचा कारभार चालवला जातो. ही कार्यालये एक प्रकारे राज्य शासनाचे जनमानसातील प्रतिनिधी असतात. या कार्यालयात सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी यांची ये-जा असते. अशावेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची वेशभूषा ही अत्यंत महत्त्वाची ठरते. संबंधितांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची एक विशिष्ठ छाप भेट देणाऱ्यांवर पडत असते. त्यामुळं या सर्वांची वेशभुषा शासकीय कार्यालयाला अनुरूप असावी यासाठीच ड्रेसकोड निश्चित करण्यात आल्याचाही पत्रकात उल्लेख करण्यात आला आहे.

ड्रेसबाबत गाईडलाईन्स पुढीलप्रमाणे –

– सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्यांना शोभेल असा असला पाहिजे.

– अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पेहराव नेहमी नीटनेटका असावा. महिला कर्मचारी कार्यालयात साडी व सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊजर पँट आणि त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसंच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करू शकतात.

– पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पँट/ट्राऊजर पँट असा पेहराव करावा. कडक रंगाचे तसंच चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले ड्रेस परिधान करू नयेत. तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात टी शर्टचा वापर करता कामा नये.

– खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा ड्रेस परिधान करावा.

– परिधान केलेला ड्रेस स्वच्छ आणि नीटनेटका असावा.

– कार्यालयात काम करताना कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचं ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावं.

– महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात स्लिपर्सचा वापर करू नये.

– कर्मचाऱ्यांनी शक्यतो चपला, सँडल, बूट (शुज) यांचा वापर करावा.

– पुरुष अधिकारी आणि कर्मचारी यांनी बूट (शुज) किंवा सँडल यांचा वापर करावा.