सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर…! ७ वा वेतन आयोगाची अधिसूचना २९ जानेवारीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली होती. सातवा वेतन आयोग जानेवारी महिन्यापासूनच लागू झाला असून २९ जानेवारीपर्यंत अधिसूचना निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे.

जानेवारी महिन्याच्या सुधारित वेतनाची थकबाकी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. वेतन आयोगाननुसार राज्य शासनाच्या विविध विभागांमधील पदे आणि संवर्गांची वेतन निश्चित करण्याचे वित्त विभागाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र अधिसूचना निघण्यापूर्वीच जानेवारीची वेतन प्रक्रिया सुरू झाल्याने सुधारित वेतनाचा फरक फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार असल्याची माहिती मिळते आहे.

राज्यातील १७ लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. त्याद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन मासिक चार ते पाच हजार रुपयांनी, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन पाच ते आठ हजार रुपयांनी तसेच प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन नऊ ते १४ हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.