सरकारी कर्मचार्‍यांचं वेतन 2 टप्प्यात, वेतनात कपात नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि शासकिय अधिकारी, कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि शासकिय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे संपूर्ण वेतन दोन टप्प्यात मिळणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

असे मिळणार कर्मचाऱ्यांना वेतन
राज्याच्या वित्त विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनापैकी 50 टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात मिळणार आहे. तर ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तीधारकांना पूर्ण वेतन मिळेल. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात कण्यात आलेली नाही. उर्वरीत वेतन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडे थकबाकी
केंद्राकडे राज्याला देय असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम मिळाली असती तर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन एकाचवेळी देणे शक्य झाले असते, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्ण वेतन दोन टप्यात
कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून त्यांच्या वेतनात कपात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या यंत्रणांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले असून या संदर्भात कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, सर्व अधिकार-कर्मचारी यांनी दोन टप्यात वेतन मिळेल असे अजित पवार यांनी सांगितले.