करदात्यांना मोठा दिलासा ! ‘विवाद से विश्वास’ स्कीमची अंतिम तारीख वाढवली, जाणून घ्या मुदत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टॅक्सपेयर्सना मोठा दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्सशी संबंधीत वाद सोडवण्यासाठी सुरू केलेल्या ’विवाद से विश्वास’ स्कीमची अंतिम तारीख पुन्हा वाढवली आहे. आता टॅक्सपेयर्स 31 मार्च 2021 पर्यंत टॅक्सशी संबंधीत वाद सोडवू शकतात. ही स्कीम आणण्याचा हेतू प्रलंबित टॅक्स वादांवर तोडगा काढणे हा आहे. तमाम न्यायालयात प्रत्यक्ष कराशी संबंधित 9.32 लाख कोटी रूपयांची 4.83 लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. या स्कीमअंतर्गत करदात्यांना केवळ वादग्रस्त टॅक्सची रक्कम भरावी लागेल. त्यांना व्याज आणि दंडावर पूर्ण सूट मिळेल.

टॅक्सपेयर्सना दिलासा देण्यासाठी तारीख वाढवली
अधिकृत वक्तव्यानुसार, विवाद से विश्वास योजनेच्या अंतर्गत टॅक्सशी संबंधीत प्रकरणे मार्गी लावणार्‍या करदात्यांना पुढे आणखी दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सरकारने मंगळवारी कोणत्याही अतिरिक्त रक्कमेशिवाय पैसे भरण्याचा कालावधी 31 डिसेंबरवरून वाढवून 31 मार्च, 2021 केला आहे. मात्र, हे पैसे केवळ घोषणा केलेल्या संदर्भात भरता येतील.

अर्थ सचिवांनी घेतली व्हिडिओ कॉन्फरन्स
अर्थ सचिव अजय भूषण पांडे यांनी विवाद से विश्वास योजनेंतर्गत आतापर्यंत निकाली काढलेल्या टॅक्स प्रकरणांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी सीबीडीटी चेयरमन आणि बोर्डाचे अन्य सदस्य तसेच प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त उपस्थित होते. पांडे यांनी म्हटले की, ही योजना करदात्यांचा लाभ आणि त्यांच्या सुविधेसाठी आहे, कारण ते याद्वारे ताबडतोब वादावर तोडगा काढू शकतात.

यापूर्वीही वाढली आहे तारीख
यापूर्वी सुद्धा सरकारने मे मध्ये आर्थिक वर्ष 2019-20 साठी भरण्यात येणार्‍या आयटीआरची अंतिम तारीख वाढवून 30 नोव्हेंबर केली होती. याशिवाय विवाद से विश्वास योजनेचा लाभ सुद्धा अतिरिक्त शुल्काशिवाय 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला होता.