‘या’ पध्दतीनं तुमच्यापर्यंत पोहोचणार ‘कोरोना’ लस, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – देशात आज २० हजार २१ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या १ कोटी २ लाख ७ हजार ८७१ वर पोहचली. आतापर्यंत ९७ लाख ८२ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १ लाख ४७ हजार ९०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, लसीकरणास सुरुवात होणे गरजेचे आहे.

त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लवकरच कोरोना लसीकरणास मंजुरी देऊ शकते. त्यामुळे सरकारने लसीकरणाची रंगीत तालीम सुरु केली आहे. आज (२८ डिसेंबर) गुजरात, आसाम, आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात झाली. त्यात येणारे अडथळे, त्रुटीनुसार लसीकरण प्रक्रियेत सुधारणा केल्या जातील. सर्वात प्रथम लसींचे डोस राज्यांत पाठवण्यात येतील. तिथून ते जिल्हा, शहर आणि गावपातळीवर पाठवले जातील.

कोरोना लसीच्या भंडारातून लसी पाठवल्या जात असताना त्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. त्यांचं तापमान वारंवार तपासून पाहण्यात येईल. सध्याच्या घडीला तीन लसी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, त्यांची साठवणूक करण्याचं तापमान वेगवेगळं आहे. त्यामुळे तापमान योग्य राहील याची काळजी घेतली जाईल. लसीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असताना लस ज्यांना दिली जाणार आहे, त्यांना एसएमएस पाठवण्यात येईल.

लस टोचली जाणार असलेल्या व्यक्तीला लसीकरणाच्या पथकाची, वेळ आणि ठिकाणाची माहिती एसएमएसमधून दिली जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीनं देण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन लस टोचून घ्यायची आहे. सुरुवातीच्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस दिली जाणार असून, त्यात आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, इतर कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असेल.