शासनाने शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जातून विमा हप्ते कपात केले असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने शासनाने संबधित शाखांना सूचना देऊन शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँक लासलगाव शाखेकडून कृषी कर्ज घेतले असून संबधित शाखेने शेतकऱ्यांच्या पिक कर्जातून कोणतीही पूर्व सूचना न देता मार्च सन २०१९ या आर्थिक वर्षात पिक विमा कपात केला आहे.मागील वर्षी शेतकऱ्यांच्या शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले होते परंतु बँकेने तशी कोणतीही पूर्व सूचना संबधित शेतकऱ्यांना त्या आर्थिक वर्षात दिलेली नव्हती.त्यामुळे संबधित शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई बँकाच्या चुकामुळे मिळाली नाही.

मार्च २०२० या आर्थिक वर्षात कर्ज भरून घेताना व रीनिव्हल करताना आपले पिक विमे कपात झाल्या असल्याचे शेतकऱ्यांना समजल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शासनाने या संबधित शाखांना सूचना देऊन शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शिवा सुराशे यांनी केली आहे.