खुशखबर ! मोदी सरकारचा AC आणि LED बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या कोणाला काय फायदा होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता देशातच या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे अनेक नव्या नोकऱ्या निर्माण होतील. तसेच वीजेच्या किंमतीवरही नियंत्रण येईल. यामुळे थेट स्वरुपात जवळपास 32 हजार लोकांना रोजगार मिळेल. अप्रत्यक्षरित्या जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सोलार पीवी मॉड्यूल आणि व्हाइट गुड्ससाठी PLI स्कीमला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी PLI स्कीमला सुरुवात केली आहे. केंद्राने व्हाईट गुड्सबाबत हा निर्णय घेतला आहे. व्हाईट गुड्स म्हणजेच एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू होय. या वस्तूंच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने PLI योजनेची घोषणा केली आहे. गोयल म्हणाले की, एकेकाळी भारतात एअर कंडीशनर तयार केले जात होते. मात्र, हळूहळू या क्षेत्रात परदेशी कंपन्यांनी आपला जम बसवला. आता देशात 70-80 टक्के AC परदेशातून आयात करावे लागते. म्हणूनच सरकारने यासाठी PLI योजनेची घोषणा केली आहे. जसजशी देशातील समृद्धी वाढेल तसतशी देशातील या वस्तूंची मागणीही वाढेल. या वस्तूंचा सीएजीआर 15-20 टक्के असल्याची माहिती गोयल यांनी दिली आहे. पुढील 5 वर्षांमध्ये या वस्तूचे देशात उत्पादन करणा-या कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचा इंसेंटिव्ह देण्यात येणार आहे. तसेच ही योजना पुढील 5 वर्षांसाठी राहणार असल्याचे ते म्हणाले. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.