राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी, सुरक्षित अन्न मिळण्यासाठी शासन कटिबद्ध – गिरीश बापट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असून यासाठी सर्व अन्न खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सोबत घेऊन मोहीम राबविणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. जागतिक अन्न सुरक्षितता दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन सचिव संजय देशमुख, अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि ‘एफ एस एस आय’ चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर, ‘गेन’ या संस्थेचे भारतातील प्रमुख तरूण वीज आणि ए.एफ.एस.टी.आय’ चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हलदे व इतर वरिष्ठ अधिकारी, विविध अन्न खाद्यपदार्थ व्यावसायिक व समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बापट म्हणाले, अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत राज्याने अनेक नव्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अन्न सुरक्षेच्या बाबतीतील बऱ्याच पुढाकारांचे देशभरात अनुकरणही होत आहे. पूर्वी अन्न खाद्य पदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची दहशत वाटत असे. आता सर्वांना सोबत घेऊन सामंजस्याने प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करून देऊन अन्न सुरक्षेसंदर्भातील काम होत आहे. यात सर्वांचा सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. यासाठी गावागावात जाऊन प्रबोधन करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

एफ.एस.एस.आय. चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल यांनी आपल्या भाषणात राज्यातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. अन्न व औषध प्रशासन चमूतर्फे करण्यात येत असलेल्या कामांचाही त्यांनी गौरव केला. अन्न पदार्थ तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या फूड टेस्टींग लॅबची राज्याची मागणी त्यांनी यावेळी मान्य केली आता राज्यात दहा कोटी रुपये प्रत्येकी एवढ्या किंमतीच्या दोन मोबाईल फूड टेस्टींग लॅब मिळणार आहेत. त्याचबरोबर दूध, आटा, मैदा, मीठ, खाद्यतेल, इ.मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, लोह, झिंक इ.चे फूड फोर्टिफिकेशन (Fortification of foods) करण्यातही राज्याने चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुप्रसिद्ध शेफ आणि ‘फूड-फूड’ हे चॅनेल चालविणारे संजीव कपूर यांनी अन्न व औषध प्रशासनच्या कामकाज पद्धतीत झालेल्या सकारात्मक बदलाचा आवर्जून उल्लेख केला. मोठ्या हॉटेल्सने स्वच्छता आणि गुणवत्ता राखल्यास देण्यात येणारे प्रमाणपत्र अधिक चांगले काम करण्यास प्रेरणा देईल, तर छोट्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांनाही या सर्व प्रक्रियेत सामावून घेतल्याने सामान्य नागरिकालाही याचा लाभ होईल असे सांगितले. त्यांच्या ‘फूड-फूड’ या चॅनेलवर राज्य शासनाच्या अन्न सुरक्षेसंबंधातील माहिती असलेल्या चित्रफित तयार करण्यास व त्याचे प्रसारण करण्यासाठी २५ लाख रुपयाचा निधी त्यांच्यामार्फत देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

डॉ. पल्लवी दराडे यांनी विभागाच्या कामाचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती ऑनलाईन कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या ऑनलाईन प्रणालीमध्ये अन्न विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना लॉग इन उपलब्ध करुन देण्यात आले आहे, तसेच कार्यवाहीबाबतची कागदपत्रे साक्षांकित करण्याकरिता डिजिटल सहीचा वापर करण्याची परवानगी दिल्याने कामकाज गतिशील होऊन कामकाजात पारदर्शकता वाढली आहे.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे नवीन संकेतस्थळ (वेबसाईट) व अन्न विभागाचे ऑनलाईन प्रणाली (FDA-MAH-FOSNET), अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे सुरक्षित व पौष्टिक आहाराबाबतचे विशेष उपक्रम असलेले महिलांसाठीचे ‘पिंक बुक’, विद्यार्थ्यांसाठीचे ‘यलो बुक’ आणि उपहारगृह चालकांसाठी ‘ऑरेंज बुकचे’ अनावरण करण्यात आले.

यावेळी स्वच्छता राखणाऱ्या तीस हॉटेल्सना हायजीन रेटींगचे प्रमाणपत्र देण्यात आले. यात मुंबईतील १५, पुणे १० आणि नागपूर येथील ५ हॉटेल्सचा समावेश आहे.

Loading...
You might also like