Corona Lockdown : ‘रमजान’च्या पवित्र महिन्यात घरीच अदा करावी ‘नमाज’ ; टेरेस, मशिदीत जमण्यास मनाई, शासनाचे निर्देश

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी रमजान महिन्यातील नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीला एकत्र न येता घरीच अदा करावी, असे आदेश शासनाने काढले आहेत.

देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यासह राज्यात कोरोनाचा थैमान थांबण्याचे नाव घेत नाही. येत्या २५ एप्रिलपासून मुस्लिमांसाठी पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. या महिन्यात मुस्लिम नागरिक मश्जिद मध्ये जाऊन पांच वेळा नमाज अदा करतात. तसेच तरावीह आणि उपवास सोडण्यासाठी सायंकाळी इफ्तारीला एकत्र येत असतात. त्यातून कोरोना विषाणुचा फैलाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व मुस्लिम धर्मीय लोकांना सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रमजानच्या महिन्यात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे

१) कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये.

२)घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.

३)मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यकम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी.

४)सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार धार्मिक कार्य पार पाडावे.

५)लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सूचनांचे काटेकारेपण पालन करण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

या सूचनांचे पालन करण्यासाठी मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे राज्याचे अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन जयश्री मुखर्जी यांनी आदेश दिला आहे़.