बँकिंग फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्वे, ‘हे’ उपाय कराल तर राहतील तुमचे पैसे सुरक्षित, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात बँकांशी संबंधित फसवणूक आणि फिशिंग ईमेल सतत वाढत आहेत. ही वाढती प्रकरणे लक्षात घेता सरकारने बँक ग्राहकांसाठी एक एडव्हायजरी जारी केली आहे, जेणेकरून ग्राहकांना संशयास्पद ईमेलपासून स्वत:चा बचाव करता येईल.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या सायबर सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटी अवेयरनेस ट्विटर हँडलद्वारे ग्राहकांना बँकिंगसाठी दोन ईमेल खाती वापरण्याचा सल्ला दिला आहे. ट्विटमध्ये असा सल्ला दिला गेला आहे की, एका खात्याचा उपयोग बँकिंग कम्युनिकेशनसाठी करा, तर दुसरे खाते आर्थिक व्यवहारांसाठी वापरा.

बँकिंग फसवणूक करणारे ऑथेंटिक खात्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या जाळ्यात फसवतात आणि बँकिंग, क्रेडिट कार्ड तपशील मिळवतात. म्हणून सरकारची ही एडव्हायजरी बँकिंग ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाणारे खाते कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर सार्वजनिक केले जाऊ नये, असेही त्यात म्हटले गेले आहे. तसेच हे खाते सोशल मीडिया खाते नोंदणीसाठी देखील वापरू नये.

मंत्रालयाने ट्वीटमध्ये विविध वेब ब्राउजरमध्ये ऑटोफिल ऑप्शनमध्ये सीव्हीव्ही, एक्सपायरी डेट, कार्ड नंबर, अकाउंट नंबर इत्यादी महत्वाच्या माहितीचा काळजीपूर्वक वापर करण्यास सांगितले आहे. यापूर्वीही सायबर दोस्त हँडलवरून बँकिंग ग्राहकांना चेतावणी देण्यात आली होती. त्यात सांगितले गेले होते की, हॅकर्स त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करून मित्र आणि कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मागू शकतात.