Coronavirus : केंद्र सरकारनं जाहीर केली कार्यालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, कर्मचाऱ्यांना पाळावे लागतील ‘हे’ 16 नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 4 ला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असलेले कार्यालय उघडण्याची मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी (दि.18) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने लॉकडाऊन दरम्यान कार्यालये उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी सूचना

1. ऑफिसमध्ये नेहमीच सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. दोन व्यक्तींमधील अंतर एक फुटाचे असणे अनिवार्य आहे.

2. प्रत्येकाला फेस मास्क वापरणे बंधनकारक असेल.

3. वेळोवेळी 40 ते 60 सेकंदापर्यंत हात धुणे आणि अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरसह कमीत कमी 20 सेकंदापर्यंत हात स्वच्छ करणे अनिवार्य असेल.

4. खोकताना किंवा शिंकताना रुमाल, टिश्यू पेपर किंवा हाताचा वापर करणे अनिवार्य असेल. यावेळी नाक आणि तोंड झाकले गेले पाहिजे. टिश्यू पेपर वापरल्यानंतर योग्यरित्या त्याची व्हिल्हेवाट लावावी.

5. ऑफिसमधील सर्वांना स्वत:चे आरोग्य परीक्षण करावे लागेल. प्रकृती खराब झाल्यास याची माहिती तात्काळ द्यावी लागेल.

6. जर एखादा कर्मचारी सर्दीसदृश लक्षणामुळे आजारी असेल तर तो कार्यालयात जाणार नाही. त्याने त्वरीत स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जर त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची पुष्टी होत असेल किंवा संशयीत असेल तर याची माहिती कार्यालयाला कळवावी.

7. जर एखादा कर्मचारी कंटेनमेंट झोनमध्ये रहात असेल आणि त्याला घरात क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असेल तर कार्यालयाने त्या कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
जर कर्मचाऱ्यामध्ये कोरनाची लक्षण दिसली…

8. जर एखाद्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण दिसत असतील तर डॉक्टरांची तपासणी होत नाही तो पर्यंत त्या कर्मचाऱ्याला मास्क घालण्यास सांगून इतर कर्मचाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यापासून दूर ठेवावे.

9. राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना त्वरीत याची माहिती कळवावी. यासाठी हेल्पलाईन क्रमांक 1075 आहे.

10. योग्य पब्लिक हेल्थ अॅथॉरिटी कोविड 19 च्या लक्षणाचे मूल्यांकन करतील आणि कर्मचाऱ्याच्या संपर्कातील लोकांच्या आणि निर्जंतुकीकरणा बाबत निर्णय घेतील.

11. जर त्या कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाचे मध्यम स्वरूपाची लक्षणं आढळत असतील तर आरोग्य प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्याला/तिला घरी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. यासाठी त्यांना आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.

12. कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाची लक्षणं अधिक असल्यास आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे त्याला पाळावी लागतील.

13. जिल्ह्यातील रॅपिड रिस्पॉन्स टीमला त्वरित बोलावणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांची यादी तयार करावी लागेल.

14. जर कर्मचाऱ्याचा कोविड 19 चा अहवाल पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख आणि कामाचे ठिकाण निर्जंतुकीकरण करावे लागेल.

… तर ऑफिस बंद होईल

15. मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, जर एखाद्या कर्यालयात एक किंवा दोन कोविड 19 पॉझिटिव्ह प्रकरण घडले तर गेल्या 48 तासात ज्या ज्या ठिकाणी संसर्ग झाला आहे त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येईल. अशा परिस्थितीत संपूर्ण इमारत किंवा कार्यालयाच्या इतर भाग सील करण्याची आवश्यकता भासणार नाही. निर्जंतुकीकरणानंतर या ठिकाणी काम सुरु केले जाऊ शकते.
16. एखाद्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कोविड 19 ची प्रकरणे आढळून आले तर अशा परिस्थितीत संपूर्ण इमारत 48 तासांसाठी सील करण्यात येईल. या दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जो पर्यंत इमारतीचे निर्जंतुकीकरण केले जात नाही तो पर्यंत इमारत सुरक्षीत असल्याचे घोषित केले जाणार नाही.