ऑनलाइन मीडिया, OTT फ्लॅटफॉर्मवर आता केंद्र सरकारचा ‘अंकुश’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील ऑनलाइन आणि डिजीटल मीडियावर आता केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा वॉच राहणार आहे. त्याबाबतचा आदेश देखील केंद्र सरकारनं जारी केला आहे. देशातील ऑनलाइन सिनेमे, ऑडिओ व्हिज्युएल प्रोग्राम, बातम्या तसेच चालू घडामोडीचा लेखाजोखा सांगणार्‍या-पुरवणार्‍या ऑनलाइन मीडियावर केंद्र सरकारचा अंकुश राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अ‍ॅमेझान प्राइम सारख्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील कंटेटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा वॉच असणार आहे.

यापुर्वीच्या काळात ऑनलाइन कंटेंट, वृत्त, चालू घडामोडी आणि बातम्या देणार्‍या वेबसाइट या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येत होत्या. हे मंत्रालय केवळ आक्षेपार्ह कंटेटवर नजर ठेवत होते. मात्र, आता माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित ऑनलाइन मीडिया, वेबसाइट्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्म असणार आहे. आगामी काळात ऑनलाइन मीडियावर केंद्र सरकारचा वॉच असणार आहे. अफवा आणि निराधार वृत्त तसेच बातम्या देणार्‍यांवर कारवाई करण्याची भूमिका सरकार घेणार आहे.