रहस्यमयी बियाणांमुळं भारतात खळबळ, तस्करीबाबत सरकारनं जारी केला Red Alert !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या कृषी उत्पादनासह राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणाऱ्या रहस्यमय बियाणांबद्दल भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आलं आहे. जहाजांद्वारे अशी बियाणं ही जगभरातील अनेक देशात पोहोचवली जात आहे. त्यामुळं याबाबत सावध राहण्यास सांगितलं जात आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे याबाबत इशारा देण्यात आला आहे.

कृषी मंत्रालयाचे उपायुक्त (गुणवत्ता नियंत्रक) डॉ दिलीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी एक पत्र जारी करण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे की, “अशा प्रकारची रहस्यमयी बियाणं पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषी विषयक तस्करीमुळं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी अशा बियाणांबद्दल सतर्क राहायला हवं. या प्रकारच्या बियाणांमधून विविध रोग पसरवण्याचाही कट असू शकतो.”

पार्सलमधून बिया

अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्युझिलंड, जपान व काही युरोपीयन देशात अशा प्रकारच्या बिया मोठ्या प्रमाणावर जहाजे/पार्सलमधून पोहोचवल्या जात आहेत. त्यामुळं जगभरात खळबळ उडाली आहे. स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय बिायणे फेडरेशननं म्हटलं आहे की, भारत जागतिक करारात सहभागी असल्यानं भारतालाही याबाबत सतर्क करण्यात येत आहे. अशा प्रकारचं कोणतंही पार्सल किंवा जहाजांद्वारे येणाऱ्या बिया या देशआतील प्रवेशाआधीच रोखाव्यात. अमेरिकेच्या कृषी खात्यानंही या प्रकाराला कृषी तस्करी असं म्हटलं आहे.