Government Job : राज्याच्या पशुसंवर्धन विभागात 3 हजार पदांची मेगाभरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील वर्षी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. दरम्यान, राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती निघणार असल्याने सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांना ही सुवर्णसंधी चालून आली आहे. या संदर्भातील माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागात तब्बल तीन हजार पदांसाठी मेगाभरती करण्यात येणार आहे. यामध्ये पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही भरण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेची माहिती येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया लांबवणीवर पडलेल्या आहेत. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने विविध विभागांमध्ये भरती प्रक्रियांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य विभागाशी निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहे. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच आदेश टोपे यांनी दिले आहेत.