सरकारनं PMKVY चा तिसरा टप्पा केला सुरू ! 8 लाख तरुणांना मिळेल ‘प्रशिक्षण’, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने (Pradhan Mantri Kuashal Vikas Yojana 3.0) चा तिसरा टप्पा शुक्रवारी सुरू झाला. त्याअंतर्गत देशातील तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत युवकांना 300 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

पीएमकेव्हीवाय (PMKVY) 3.0 योजनेच्या 2020-21 च्या कालावधीत 8 लाख लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्दीष्ट जिल्हा कौशल्य समित्या मजबूत करणे आणि सक्षम करणे तसेच मागणीवर आधारित कौशल्य विकास उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे आहे.

948.90 कोटी रुपये होतील खर्च
यावर 948.90 कोटी रुपये खर्च केले जातील. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पीएमकेव्हीवाय 3.0 मध्ये जिल्हा कौशल्य समित्यांना जोडून एक नवीन उपक्रम सुरू केला गेला आहे. पीएमकेव्हीवाय 3.0 प्रारंभिक पातळीवर युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करेल जेणेकरुन ते उद्योगाशी संबंधित संधींचा फायदा घेण्यास सक्षम असतील.

717 जिल्ह्यात सुरू करण्यात आले
पीएमकेव्हीवाय ही एक देश, एक योजनेच्या दृष्टीने अग्रणी योजना आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांच्या 717 जिल्ह्यांमध्ये पीएमकेव्हीवाय 3.0 सुरू करण्यात आले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने टाकले गेलेले हे अजून एक पाऊल आहे. निवेदनात म्हटले आहे की ही योजना अधिक विकेंद्रित पद्धतीने राबविली जाईल आणि यामध्ये राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांची अधिक जबाबदारी असेल.

मिळतील हे फायदे
या योजनेंतर्गत प्रत्येक प्रमाणित उमेदवाराला दोन लाख रुपयांचा तीन वर्षाचा आकस्मिक विमा (कौशल्य विमा) देखील देण्यात येईल. या योजनेंतर्गत, सर्व उमेदवारांना कुशल भारत मिशन अंतर्गत राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था (एनसीव्हीईटी) कडून प्रमाणपत्रही मिळणार आहे. मंत्रालयानं म्हटलं आहे की तरुणांना उद्योग 4.0 च्या अनुसार कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी आणि जिल्हा पातळीवर त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल.

अशा प्रकारे करा नोंदणी
– पीएमकेव्हीवाय मध्ये नोंदणी करण्यासाठी आपल्याला https://pmkvyofficial.org वर जाऊन आपले नाव, पत्ता आणि ईमेलची माहिती द्यावी लागेल.
– फॉर्म भरल्यानंतर अर्जदार ज्या तांत्रिक क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छित असेल त्यास निवडणे आवश्यक असेल.
– पीएमकेव्हीवायमध्ये बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग्ज, हँडीक्राफ्ट, जेम्स व ज्वेलरी आणि लेदर टेक्नॉलॉजी अशी जवळपास 40 तांत्रिक क्षेत्रे आहेत.
– यामध्ये प्राधान्यकृत तांत्रिक क्षेत्राच्या अतिरिक्त एक तांत्रिक क्षेत्र देखील निवडावे लागेल.
– ही माहिती भरल्यानंतर तुमचे प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल.