50 हजाराची लाच घेताना सरकारी वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी चक्क कोर्टरुमध्येच ५० हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अतिरिक्त सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले. मंगेश सदाशिव आरोटे (वय ३९) असे या सरकारी वकिलाचे नाव आहे. या कारवाईने वकिल वर्गात एकच खळबळ उडाली.

याबाबतची माहिती अशी, ब्रांदा येथील सुलतान मानसुरी त्यांच्यावर जमिनीच्या व्यवहारात बनावट स्टँम्प वापरल्याच्या आरोपावरुन खटला दाखल करण्यात आला होता. गेली २० ते २५ वर्षांपासून ते तेथे राहत असून आता त्यांच्या जागेची किंमत ६० ते ७० कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यांचा जमीन मालक २००२ पासून बेपत्ता झाला आहे. जमीनमालकाच्या बहिणीने या भाडेकरुकडे असलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप केला आहे. या खटल्यातून आपल्याला दोषमुक्त करावे असा अर्ज सुलतान मानसुरी यांनी न्यायालयात केला आहे.

आरोटे हे दुसऱ्या कोर्टात काम पाहतात. असे असताना त्यांनी या खटल्यात रुची दाखविण्यास सुरुवात केली. त्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील मंगेश आरोटे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व त्यांना खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली.

सुलतान यांचे वकिल प्रशांत पांडेय यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हाला तपास करणारे पोलीस अधिकारी पैसे मागत असेल असे वाटले. जेव्हा सरकारी वकीलच लाच मागत असल्याचे समजल्यावर आम्हाला धक्काच बसला.

आरोटे यांनी त्यानंतर १५ लाखावरुन ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यावर सुलतान यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांनी याची पडताळणी केल्यावर आरोटे हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. आरोटे यांनी गुरुवारी सुलतान यांना फोन करुन काळा घोडा येथील एका कोर्टरुममध्ये बोलावले. तेव्हा त्यांनी आरोटे यांना कोर्टरुमच्या बाहेर येण्यास सांगितले. तरीही त्यांनी आत येण्यास सांगितल्यावर ते कोर्टरुममध्ये गेले. तेव्हा कार्टरुम रिकामे होते. त्यांनी ५० हजार रुपये आरोटे यांच्याकडे देऊन पोलिसांना इशारा केला. त्याबरोबर बाहेर थांबलेल्या पोलिसांनी आत येऊन आरोटे यांना पैशांसह रंगेहाथ पकडले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like